info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  18 Feb 2023

अमरावतीत क्रीडा विद्यापीठ स्थापण्यास चाचपणी- देवेंद्र फडणवीस*कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला भेट*

नागपूर, दि.१8- पुण्यात लवकरच क्रीडा विद्यापीठ सुरू होणार असून त्याच धर्तीवर अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे क्रीडा विद्यापीठ सुरू करता येईल का, याविषयी चाचपणी सुरू आहे. औरंगाबाद येथेही क्रीडा विद्यापीठ सुरू करावयाचे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 
             कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेला समर्थ स्टेडियम, चिटणीस पार्क येथे १५ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धास्थळी भेट दिली. यावेळी आ. प्रवीण दटके, आमदार समीर मेघे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, महानगरपालिका क्रीडा अधिकारी  पीयुष आंबुलकर, विदर्भ खो-खो संघटनेचे सचिव सुधीर निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.  
        क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेतून अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यास मदत होईल. स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील. या माध्यमातून खेळांचा दर्जाही उंचावेल आणि गुणवत्ता प्राप्त खेळाडूंना योग्य प्रशिक्षण अगदी सुरुवातीच्या काळापासून प्राप्त होईल. त्याचा लाभ राज्याला व खेळाडूंना आपली कामगिरी उंचावण्यासाठी होईल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. 
          मुख्यमंत्री पदावर असताना खेळाडूंना कशाप्रकारे प्रोत्साहन मिळेल याविषयीचे अनेक हितकारी निर्णय घेतले. खेळाडूंना शासकीय नोकरीत थेट सामावून घेणे, खेळाडूंसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे किंवा वेगवेगळ्या खेळामध्ये प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करणे असे अनेक क्रीडाविषयक धोरणात्मक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. 
           मध्यप्रदेशात नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्राची ही सरशी अत्यंत आनंददायी आहे. खेळाडूंसाठी मोठ्या प्रमाणावर क्रीडाविषयक पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी न्युट्रिशन, फिजिओथेरपिस्ट, प्रशिक्षक, परदेशी प्रशिक्षक ही गरज ओळखून पूर्णत्वास नेण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले. 
         खेळामध्ये जय पराजयापेक्षा खिलाडूवृत्ती महत्वाची असते. ही खिलाडूवृत्ती  एकदा तयार झाली की मग आपल्याला जीवनाच्या कुठल्याही  क्षेत्रामध्ये मागे वळून पाहावे लागत नाही. खिलाडूवृत्ती असणारे खेळाडू पराभव हा   खुल्या मनाने पत्करतात तर विजयाची हवा त्यांच्या डोक्यात जात नसल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्र्यांनी स्पर्धेत सहभागी संघातील खेळाडूंशी संवाद साधला. 
         जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व विदर्भ खो-खो संघटनेच्या संयुक्त विद्यमाने कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण ६८० खेळाडू, मार्गदर्शक, संघ व्यवस्थापक तसेच शंभर संघटनांचे प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेतील सर्वच खेळाडूंचा एक वर्षाचा प्रत्येकी दोन लक्ष रुपयांचा विमा काढण्यात आला आहे.  एकूण सहा प्रकारचे प्राविण्यस्तर या स्पर्धेत असणार आहे. तर २३ लाख २६ हजार रुपयांची बक्षिसे या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना वाटप करण्यात येणार आहे.
*****