पीएम किसान पोर्टलवर मोबाईल नंबर अद्यावत करा
*विभागातील ६ हजार लाभार्थी शेतकऱ्यांनी दिला चुकीचा मोबाईल क्रमांक*
*नागपूर, दि. 29: अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने सुरु केलेल्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ व राज्य शासनाने सुरु केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा लाभ घेण्यासाठी पीएम किसान पोर्टलवर नोंदणीकृत शेतकऱ्यांनी येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत मोबाईल क्रमांक अद्यावत करण्याचे आवाहन, विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी केले आहे.
विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये पीएम किसान पोर्टलवर नोंदणी करतेवेळी लाभार्थी शेतकऱ्यांनी चुकीचा किंवा एकच मोबाईल क्रमांक अनेक शेतकऱ्यांच्या नावे नोंदविण्यात आल्याची बाब समोर आली असून ६ हजार ३० शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. यात विभागातील वर्धा जिल्ह्यातील ४९९, नागपूर जिल्ह्यातील ८७२, भंडारा जिल्ह्यातील ५३०, गोंदिया जिल्ह्यातील ९३१, चंद्रपूर जिल्ह्यातील १६२४ आणि गडचिरोली जिल्ह्यातील १५७४ नोंदी आढळल्या आहेत. यामुळे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेसंबंधीत कोणतेही एसएमएस प्राप्त होत नाही. या शेतकऱ्यांची यादी संबंधीत गावाच्या कृषी सहायकांकडें उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने दिली आहे.
शेतकऱ्यांना मोबाईल क्रमांक अद्यावत करण्याकरिता केंद्र शासनाच्या पी. एम. किसान पोर्टलवर फार्मर कॉर्नरमध्ये अपडेट मोबाईल क्रमांकाची सुविधा उपलब्ध असून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अद्यावतीकरण करता येणार आहे. "पी.एम.किसान सन्मान निधी योजना" व राज्य शासनाच्या "नमो शेतकरी महासन्मान निधी" या दोन्ही योजनेचा लाभ मिळविण्याकरिता शेतकऱ्यांना पी. एम. किसान पोर्टलवर ई-केवायसी व लँड सीडींग तसेच बँक खात्याला आधार जोडणी करणे अनिवार्य आहे.
१ डिसेंबर २०१८ पासून सुरू असलेल्या केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनें’तर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रुपये तर याच योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनामार्फत अतिरिक्त ६००० रुपये जमा करण्यात येतात. वर्षाला जमा होण्याऱ्या एकूण १२००० रुपयांपैकी दर चार महिन्यांच्या अंतराने केंद्र शासनातर्फे २००० रुपये व राज्य शासनाकडून २००० रुपये अशी एकूण ४००० रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात.