info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  23 Nov 2022

आता जन्मतःच बाळाचे आधार कार्ड मिळणार*



-*जिल्हाधिका-यांचे ‘आधार अॅट बर्थ’ चे निर्देश*

नागपूर दि. २3- आधार ओळखपत्र ही आज काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून नागपूर जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी रुग्णालयात बाळाचा जन्म होताच त्याचे आधार कार्ड (Aadhaar at Birth) काढणे आता बंधनकारक राहणार आहे.  जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी यासंदर्भातील निर्देश दिले आहेत. 
       रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या प्रत्येक बालकाच्या आधारची प्रक्रिया पोस्ट विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने पूर्ण केल्या जाईल व रुग्णालयात जन्मलेले एकही नवजात बालक आधार प्रक्रियेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची संबंधित यादीतील रुग्णालयांच्या प्रमुखांनी आणि पोस्ट ऑफीस कर्मचारी यांनी दक्षता घ्यावी. तसेच रुग्णालय प्रमुखांनी या कार्याचा मासिक अहवाल विहित नमुन्यामध्ये दरमहा जिल्हाधिकारी कार्यालयास तसेच जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
       राज्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमधील जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केन्द्र येथील संस्था प्रमुखांना त्यांच्या रुग्णालयातील इमारतीत व रुग्णालयीन परिसरात होणा-या जन्मांच्या नोंदणीसाठी निबंधक, जन्म व मृत्यू म्हणून नेमणूक करण्यात आली आहे व यासंदर्भात सर्वांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सर्व शासकीय रुग्णालयातील निबंधकांनी आपल्या रुग्णालयात बाळाचा जन्म होताच बाळाचे जन्म प्रमाणपत्र काढून द्यावे. रुग्णालयनिहाय मॅपिंग करून देण्यात आलेल्या इंडिया पोस्ट पेंमेंट बँक आधार नोंदणी कर्मचा-यांना बोलावून बाळाचे आधार कार्ड तत्काळ काढून घेण्यात येईल. तसेच खाजगी आरोग्य संस्थांमध्ये जन्म झालेल्या बालकांची संबंधित संस्थाप्रमुख यांनी गुगल शिटमध्ये परिपूर्ण माहिती भरावी व संबंधित फॅार्म क्र.1  भरून कार्यक्षेत्रातील झोन सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयातील जन्म-मृत्यू नोंदणी विभागास सादर करावा. जन्म प्रमाणपत्र प्राप्त करून घेतल्यावर संबंधित खाजगी संस्थाप्रमुखानी इंडिया पोस्ट पेंमेंट बँक आधार नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलावून बाळाचे आधार कार्ड काढून देण्यात येणार आहेत.