info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  06 Sep 2023

नागपुरात २० लाखांपर्यंत लाभार्थ्यांचे ध्येय गाठा*-देवेंद्र फडणवी



*नागपुरात २० लाखांपर्यंत लाभार्थ्यांचे ध्येय गाठा*-देवेंद्र फडणवीस


*नागपूर, दि.५* : 'शासन आपल्या दारी'  अभियानाद्वारे शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोचवून त्याचे जीवन सुखकर करण्याचे शासनाचे ध्येय आहे. या अभि यानांतर्गत नागपुरात जनसामान्यांना लाभ देण्याचे चांगले कार्य सुरू असून प्रशासनाने लवकरच २० लाख लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोचविण्याचे उद्दिष्ट गाठावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
 
        येथील मॉडेल मिल चौकातील गाडीखाना क्रीडा  मैदानावर मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी आमदार विकास कुंभारे यांनी 'शासन आपल्यादारी' अभियानांतर्गत आयोजित केलेल्या शिबिरात श्री. फडणवीस बोलत होते. आमदार सर्वश्री  प्रवीण दटके, मोहन मते, कृष्णा खोपडे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते.

     फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील जनतेला सरकारी योजनांचे लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राज्यात या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत दीड कोटी जनतेला लाभ देण्यात आला आहे. नागपुरात या कार्यक्रमांतर्गत विविध शिबिरांचे आयोजन करून आजपर्यंत ७ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. प्रशासकीय यंत्रणेने गतीने कार्य करीत या कार्यक्रमांतर्गत २० लाख लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्याचे ध्येयपूर्ण करण्याचे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले.
     
      लोकशाहीत शासन हे जनतेला जबाबदार असते आणि त्याच दिशेने राज्यशासन कार्य करीत असून विविध जनकल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहेत. जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील सर्वच जनतेला ५ लाखा पर्यंतचे लाभ देण्यात येत आहेत.नागपुरातील दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयात उच्च व गुणात्मक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत,असेही त्यांनी सांगितले.

    श्री. फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.मध्य नागपूर विधानसभा मतदासंघात ४ सप्टेंबर पासून 'शासन आपल्यादारी' अभियानांतर्गत आयोजित  शिबिरातून जनतेला रेशन कार्ड, चष्मे वितरण, भूमी पट्टे वितरण असे विविध लाभ देण्यात येत असून ही  समाधानाची बाब असल्याचे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.