जी-20 मेट्रोच्या सौदर्यीकरणाला सुरूवात
*नागपूर, दि १8-वर्धा रोडवरील विमानतळ ते छत्रपती चौका दरम्यानच्या तीन मेट्रोस्टेशन खाली दर्शविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र व विदर्भाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक देखाव्याची तयारी सुरु आहे. जी-२० परिषदेसाठी नागपूर शहरात येणाऱ्या देश-विदेशातील पाहुण्यांना या समृद्ध वारश्याचे दर्शन घडविण्यासाठी लवकरच या मेट्रो स्टेशन दरम्यान हे देखावे लावण्यात येणार आहेत.
जी-२० परिषदेसाठी येणाऱ्या देश-विदेशातील पाहुण्यांना विमानतळाहून शहरात प्रवेश करातांनाच मेट्रोच्या छत्रपती चौक, उज्वल नगर आणि जयप्रकाश नगर स्टेशन मार्गीकेच्या पीलर दरम्यान नागपूर मेट्रोच्यावतीने देखावे उभारण्यात येणार आहेत. यासाठी धरमपेठ मेट्रो स्टेशन शेजारील क्रेजी कॅसल या फाँड्रीमध्ये देखावे निर्मितीचे कार्य सुरु आहे. छत्रपती चौक मेट्रो स्टेशन मार्गीकेच्या पीलर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा देखावा या फाँड्रीमध्ये तयार होत आहे.
उज्वलनगर मेट्रो स्टेशनच्या पीलर दरम्यान विदर्भातील आदीवासी व त्यांची गौरवशाली परंपरा दर्शविणारे देखावे मांडण्यात येणार आहेत. या देखावा निर्मितीचे कार्यही येथे सुरु आहे. जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशन पीलर दरम्यान पेंच अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील प्राणी, मोगली हे प्रसिद्ध दूरचित्रवाणी मालिकेतील पात्र व जैव संपदा साकारण्यात येणार आहे. त्यासाठी प्राण्यांचे देखावे येथे तयार करण्यात येत आहेत.