info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  19 Mar 2024

नागपूर,रामटेक लोकसभा मतदार संघात 19 एप्रिलला मतदान


 
नागपूर दि.19- नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार संघासाठी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून प्रशासनाची सज्जता झाली आहे. जिल्हा प्रशासनाने या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये ७५ टक्के पेक्षा अधिक मतदानाचे ध्येय ठेवले आहे. यासाठी "मिशन डिस्टिंगशन" सर्व मतदारांच्या सहभागातून यशस्वीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज दिली.

भारत निवडणूक आयोगाने आज देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमाची घोषणा केली असून महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघासहित देशातील सर्व ५४३ लोकसभा मतदारसंघासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील नागपूर ( मतदारसंघ क्र.१०) आणि रामटेक ( मतदारसंघ क्र.९) लोकसभा मतदार संघासाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात प्रशासनाच्या सज्जतेसह विस्तृत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. इटनकर यांनी ही माहिती दिली. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचार संहितेच्या नोडल अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक लोकसभा मतदार संघाचे  मुख्य निवडणूक अधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आदी यावेळी उपस्थित होते.

४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग मतदार वयोवृद्ध (८५ वयवर्षे) मतदार, अत्यावश्यक सेवावरील कर्मचारी-अधिकारी, निवडणूकीसाठी कर्तव्यावर असलेले अधिकारी-कर्मचारी, पोल पर्सोनेल, पोलीस पर्सोनेल अशा मतदारांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा असेल. यासाठी १२/१२अ, १२ड क्रमांकाचा अर्ज भरणे आवश्यक राहील असे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी सांगितले.

दोन्ही लोकसभा मतदारसंघ निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाची संपूर्ण सज्जता झाली असून सर्वांनीच  आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी केले.

डॉ. रविंद्र सिंगल आणि हर्ष पोद्दार यांनी संपूर्ण निवडणूक काळातील सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील तयारीविषयी माहिती दिली. सौम्या शर्मा यांनी पेडन्यूजबाबत प्रसारमाध्यमांनी घ्यावयाची काळजी आणि माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीशी संपर्कसाधून या संदर्भातील नियम समजून घेत चुका टाळण्याचे आवाहन केले. रामटेक लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आयोजनाविषयी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीबाबत माहिती दिली.  
      
*असा असेल निवडणूक कार्यक्रम*
या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी २० मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. २७ मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर २८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. ३० मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. ४ जून रोजी मतमोजणी  होवून निकाल जाहीर होणार आहे. ६ जून पर्यंत जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. 

नागपूर मतदार संघात 
२ हजार १०५ मतदान केंद्र

नागपूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत ६ विधानसभा मतदार संघात एकूण २ हजार १०५ तर रामटेक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत ६ विधानसभा मतदारसंघात एकूण २ हजार ४०५ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. या दोन्ही मतदारसंघासाठी स्ट्राँग रुम आणि मतमोजणीची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समिती, कळमणा येथे करण्यात येणार आहे.  ही सर्व निवडणूक यंत्रणा पार पाडण्यासाठी एकूण ७ हजार ५७३ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.  मतदार शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.