info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  14 Sep 2023

अनाथ,जन्मांध माला पापडकरचे एमपीएससीत यश



        *नागपूर दि.14* : जन्मत: अंध असल्याने आई-वडिलांनी  मुलीला जळगाव रेल्वे स्थानकावर कचऱ्याच्या पेटीत टाकून दिले. ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांनी आपल्या वझ्झर येथील अनाथ आश्रमात या मुलीचा सांभाळ केला, माला शंकरबाबा पापळकरने आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ‘गट ब’ आणि ‘गट क’ पूर्व परीक्षा उत्तीर्ण करून मोठे यश मिळविले आहे.या यशासाठी आदिवासी विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी मालाचा सत्कार करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

          येथील गिरीपेठ भागातील अपर आयुक्त कार्यालयात दैनंदिन कामाच्या व्यस्ततेत श्री. ठाकरे यांच्या कॅबिनमध्ये मालाचा छोटेखानी गौरवसमारंभ पार पडला. वझ्झर येथील अनाथ आश्रमातील वार्डन वर्षा काळे, मालाच्या  मैत्रिणी ममता,वैषाली,पद्ममा आणि शिवकुमार पापळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी या सोहळयाचे प्रत्यक्षदर्शी ठरले.

            समाजाने  नाकारलेल्या 127 मुलींसोबत मालाचा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या अंबादासपंत वैद्य बेवारस मतिमंद बालगृहात  जीवनप्रवास सुरु झाला. जिद्द व मेहनतिच्या बळावर मालाने शिक्षणाचा प्रवासही सुरु ठेवला.अमरावती येथील प्रतिष्ठीत विदर्भ ज्ञान,विज्ञान महाविद्यालयातून (व्हीएमव्ही) तिने कला शाखेची पदवी पूर्ण केली. यानंतर 2019 पासून स्पर्धा परीक्षेद्वारे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मालाचा प्रवास सुरु झाला. मंगळवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या ‘गट ब’ आणि ‘गट क’ पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होवून  मालाच्या जिद्दीला यश मिळाले.

            माला ही नागपूरमध्ये आल्याचे कळताच श्री.ठाकरे यांनी कार्यालयात बोलवून तिला पुष्पगुच्छ देत व पेढा भरवून सत्कार केला. तिच्या परिश्रमला मिळालेल्या यशाचे कौतुक करतानाच शासकीय सेवेत येवून मालाने उत्तम कार्य करावे, अशा शुभेच्छाही दिल्या.

            या छोटेखानी सत्कार सोहळयाने आनंदी झालेल्या मालाने यशाचे श्रेय शंकरबाबा पापळकर, युनिक अकॅडमी अमरावतीचे प्रा.अमोल पाटील आणि मालाच्या उच्च शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या प्रकाश टोपले यांना दिले व शासकीय सेवेत येवून जनसेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला.