रस्त्यांवरील मुलांच्या शिक्षणासाठी‘फिरते पथक’
- विभागीय आयुक्तांनी दाखविला हिरवा झेंडा
नागपूर, दि. 03 : रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या महत्वाचा प्रवाहात आणण्यासाठी पथदर्शी फिरते पथक हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी व जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी फिरते पथक बसला हिरवा झेंडा दाखविला.
महिला व बाल विकास विभागाने राज्यात नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या प्रकल्पाला केंद्र शासनाची मान्यता असून हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर 6 महिण्याकरीता राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात या प्रकल्पासाठी सह्याद्री फाऊंडेशन या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
फिरते पथकात बसमध्ये 25 मुलांची आसन क्षमता आहे. बस ही बालस्नेही असून बसमध्ये मुलांकरिता एक समुपदेशक, एक शिक्षक, एक वाहन चालक, एक काळजी वाहक अशा एकूण चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व ट्रॅकिंग सिस्टिम लावण्यात आली आहे. सहा वर्षाखालील बालके जे शाळेत जात नाही अशा बालकांना निवडण्यात आलेल्या हॉटस्पॉट जवळील अंगणवाडी केंद्रासोबत संलग्न करण्यात येईल. मुलांना ताजे, रुचकर तसेच स्वच्छ, पोषक अन्न देण्यात येईल. बसची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 अशी राहील व जिल्ह्यातील शहरातील, गरजेच्या ठिकाणी ज्या ठिकाणी रस्त्यावर मुलांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी बस हजर राहणार असून आलेल्या बालकांचे आधार कार्ड काढण्यात येईल. एकटे व अनाथ बालके आढळल्यास बाल कल्याण समिती समक्ष हजर करण्यात येईल. बालकांना खेळ, शैक्षणिक साहित्य, गाणी, नृत्य या गोष्टींद्वारे अभ्यासाची आवड लावण्यात येणार आहे.
विभागीय उपायुक्त महिला बाल विकास विभाग अपर्णा कोल्हे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी भारती मानकर, जिल्हा परिविक्षा अधिकारी चंद्रकांत बोन्डे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, सह्याद्री फाऊंडेशनचे संचालक देवेंद्र श्रीरसागर यावेळी उपस्थित होते.