info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  14 Feb 2023

जी-20 परिषदेची तयारी जोरात


 
*शाळा, महाविद्यालय आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून विविध उपक्रम*

*नागपूर, दि.14* :  शालेय  विद्यार्थ्यांद्वारे अभिरुप जी-20 परिषद, निबंध, वक्तृत्व आदी स्पर्धा मॅरेथॉन, फ्लॅश मॉबच्या माध्यमातून पुढील महिन्यात नागपूर शहरात होऊ घातलेल्या जी-20 परिषदेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी आज संबंधित शाळा,गटशिक्षण अधिकारी व अन्य प्रतिनिधिक संस्थांची बैठक घेऊन जी-20 परिषदेबाबत जनजागृतीसाठी  विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या.

          जिल्हा परिषदेच्या कै. आबासाहेब खेडकर सभागृहात आज श्रीमती शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जी-20 परिषदेच्या आयोजना पूर्वी राबवावयाच्या विविध जनजागृतीपर उपक्रमांच्या आयोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. शिक्षणाधिकारी  (माध्यमिक) रविंद्र काटोलकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर  विद्यापीठाच्या आंतरविद्या शाखा विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाचे प्राचार्य संजय जठार, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकारी, निवडक 20 खाजगी शाळांचे मुख्याध्यापक आदी यावेळी उपस्थित होते.

*शालेय विद्यार्थी साकारणार ‘अभिरुप जी-20 परिषद’*

नागपूर शहरातील निवड करण्यात आलेल्या 20 शाळांचे इयत्ता 9 वी आणि 11 वीचे विद्यार्थी-विद्यार्थीनी अभिरुप जी-20 परिषदेत सहभाग घेणार आहेत. प्रत्येक शाळेतून दोन विद्यार्थी जी-20 च्या सदस्य देशांपैकी एका देशाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. त्या देशातील नागरिकांचा पेहराव व सादरीकरण विद्यार्थी करणार आहेत. ही अभिरुप जी-20 परिषद जिल्हा परिषदेच्या कै. आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये जी-20 परिषदेबाबत जागृती करण्याचा मुख्य उद्देश या आयोजनामागे आहे. अभिरुप जी-20 परिषदेत सहभागी होणाऱ्या  प्रत्येक शाळेतील दोन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जी-20 परिषदेसाठी येणाऱ्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे.   
 
*विविध शालेय स्पर्धा, फ्लॅश मॉब, मॅरेथॉनचे आयोजन*

          नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये जी-20 परिषदेबाबत जागृती निर्माण होण्याकरिता निबंध स्पर्धा, चित्रकला, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांचे आयोजन करण्याच्या  सूचना श्रीमती  शर्मा  यांनी दिल्या. याचबरोबर गैरसरकारी  संस्थांच्या प्रतिनिधींनी  प्रत्येक आठवड्याच्या  शनिवार आणि रविवारी  शहरातील मॉल, बाजार आदी महात्वाच्या ठिकाणी जी-20 बाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी फ्लॅश मॉब आयोजित करावे अशा सुचनाही  श्रीमती शर्मा यांनी केल्या.

       जी-20 परिषदेबाबत जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाने येत्या 11 मार्च रोजी मॅरेथॅानचे आयोजन करण्यात यावे, अशा सुचनाही श्रीमती शर्मा यांनी केल्या. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मॅरेथॉनचे उदघाटन करण्यात येणार आहे.