info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  04 Oct 2022

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर विधी सेवा केंद्रनागपूर,दि. 04: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व धर्मादाय आयुक्त व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरामध्ये येणाऱ्या अनुयायांकरिता  4 ते 5 ऑक्टोबर या दोन दिवसाच्या कालावधीसाठी स्थापित करण्यात आलेल्या विधी सेवा केंद्राचे उद्घाटन आज करण्यात आले.
या विधी सेवा केंद्राचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश-10 व अतिरिक्त न्यायाधीश एस.बी. गावंडे व  सहायक धर्मादाय आयुक्त आभा कोल्हे आणि यांच्या हस्ते पार पडले. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश  वरिष्ठ स्तर जयदीप पांडे, आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.ए. मेहरे, अधिवक्ता आनंद फुलझेले, वरीष्ठ अधिवक्ता राजेंद्र राठी, रणजीत सरडे यावेळी उपस्थित होते.
जिल्हा न्यायाधीश-10 व अतिरिक्त न्यायाधीश एस.बी. गावंडे यांनी  विधी सेवा केंद्र स्थापन करण्याचा उद्देश सांगून व्यक्तींकरीता असलेल्या योजना व योजनाचा लाभ कशा प्रकारे प्राप्त करता येईल, याबाबत उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केले.  
समाजातील गरजू  व तळागाळातील व्यक्तींसाठी कोणकोणत्या योजना राबविण्यात येतात याबाबत माहिती देतांना विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप पांडे यांनी  विधी सेवा केंद्र स्थापित करण्यात आले असून या केंद्रामध्ये भेटी देवून आपल्या अडचणीचे निराकरण करावे, असे आवाहन त्यांनी केले.
निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयामध्ये मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केला जातो. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 85 हजार रुपयेपर्यंत आहे, अशा रुग्णाचे पूर्णपणे मोफत उपचार केला जातो. तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न 85 हजार ते 1 लाख 60 हजार रुपये पर्यंत आहे त्यांचा वैद्यकीय उपचार सवलतीच्या दरात केला जातो. त्यासोबत धर्मादाय कार्यालयातर्फे गरजु व्यक्तींसाठी असलेल्या योजना व योजनांचा लाभ कशा प्रकारे प्राप्त करता येईल, याबाबत उपस्थित भाविकांना सहायक धर्मादाय आयुक्त आभा कोल्हे यांनी  मार्गदर्शन केले.
यावेळी आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.ए. मेहरे व विभाग प्रमुख डॉ. एच.व्ही. मेनन यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने केले व आभार प्राध्यापक डॉ. पी.आर. लोखंडे  यांनी मानले.