महाज्योतीची युपीएसी प्रवेश परीक्षा ,गैरव्यवरहार कारवाई होणार
महाज्योतीच्या युपीएससी प्रवेश परीक्षा
गैरव्यवहार प्रकरणी कारवाई होणार
नागपूर, दि.23- महाज्योती मार्फत UPSC पूर्व प्रशिक्षणासाठी दि.16 जुलै रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रवेश परीक्षा घेण्यात आली. महाज्योती मार्फत विविध प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यासाठी एजन्सी निवडण्याकरीता ई-निविदा प्रक्रिया करण्यात आलेली होती. निविदा प्रक्रियेतून परीक्षा घेणारी एजन्सी नियुक्त करण्यात आली. सदर एजन्सी मार्फत महाज्योती करीता UPSC पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी दि. 16 जुलै रोजी परीक्षा आयोजीत केलेली होती. या परीक्षेसाठी 20 हजार 218 उमेदवार पात्र होते त्यातील 13 हजार 184 उमेदवारांनी महाराष्ट्रातील 102 परीक्षा केंद्रांवर तर दिल्ली येथील 2 परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. परीक्षा झाल्यावर काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहे.
चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला या प्रकरणात CCTV फुटेज तपासून गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला आहे. अशा प्रकारे प्रकरणाची चौकशी महाज्योतीने सुरु केलेली आहे. परीक्षेदरम्यान गैरव्यवहार करणाऱ्या विद्यार्थ्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.