जिल्ह्यात 57 हजार नवे मतदार
*जिल्ह्यात 57 हजार नवे मतदार*
-*मतदार नोंदणीचे जिल्हाधिका-यांचे आवाहन*
नागपूर, दि. 29 – 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. यात जिल्ह्यात 57 हजार 34 मतदारांची तर 10 मतदार केंद्रांची वाढ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या आयोजित बैठकीत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
1 जूनपासून मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील मतदारांची संख्या 41 लाख 16 हजार 843 होती. यात वाढ होऊन मतदारांची संख्या 41 लाख 73 हजार 877 झाली आहे. 57 हजार 34 मतदारांची यात वाढ झाली आहे. तर यापूर्वी जिल्ह्यात 4 हजार 464 मतदार केंद्रे होती. यात आता या केंद्रांमध्ये दहाने वाढ होऊन ती 4 हजार 474 झाली आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या 271 वरून 276 झाली आहे. तर दिव्यांग मतदारांच्या संख्येत 514 ने वाढ होऊन ती 18 हजार 64 वरून 18 हजार 578 झाली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. इटनकर यांनी यावेळी दिली.
एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर 9 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. 26 डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. यादीच्या अंतिम प्रसिद्धीसाठी 1 जानेवारी 2024 पर्यंत निवडणूक आयोगाची परवानगी येऊन डाटाबेस अद्ययावत करणे तसेच पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी यावेळी दिली.
मिशन युवा अंतर्गत आतापर्यंत सुमारे 30 हजार युवा मतदारांची नोंदणी झाली आहे. ही संख्या 75 हजारापर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. यासाठी महाविद्यालयांचे, विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य यांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
शहरातील सोसायट्यांमध्ये कमी प्रमाणात मतदार नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले आहे. सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांनी आपल्या सोसायटीतील मतदार नोंदणी पूर्ण झाली असल्याची खात्री करावी. नागरिक मतदार नोंदणीसाठी वंचित राहू नये याकडे लक्ष द्यावे, असे जिल्हाधिका-यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
पत्रकार परिषदेला उपजिल्हाधिकारी (निवडणूक)प्रवीण महिरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.