info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  05 May 2024

मनरेगांतर्गत बांबू लागवडीला प्राधान्य- नंदकुमार*

*मनरेगांतर्गत बांबू लागवडीला प्राधान्य-    नंदकुमार*

*-नागपूर विभागाची आढावा बैठक*
*-राज्यात एक लाख हेक्टर हरित आच्छादनाचे उदिष्ट्ये*

*नागपूर दि.5* :  बांबू लागवडीमुळे रोजगार निर्मिती,  पर्यावरण रक्षण, हरित आच्छादनात वाढ होते ۔ सिंचन व्यवस्था बळकट होण्यास मदत होत असल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा)  नागपूर विभागात  बांबू लागवडीची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांनी  संबंधीत विभागांच्या यंत्रणांना दिले. 

         विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘समता मुलक शाश्वत पर्यावरणीय विकासातून समृध्दीसाठी  मनरेगा मिशन मोडवर राबविणे’ विषयावर  नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

       विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, आदिवासी  विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, पर्यावरण व वातावरणीय बदलाचे संचालक अभिजीत घोरपडे, रोहयोच्या उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांच्यासह नागपूर, चंदपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंधारण, वने व पर्यावरण, पाटबंधारे, कृषी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  

          मनरेगांतर्गत चालू आर्थिक वर्षात राज्यात १ लक्ष हेक्टर क्षेत्रावर हरित आच्छादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून गरिबी निर्मूलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये बांबू लागवडीला प्राधान्य द्यावे, अशा सूचना नंदकुमार यांनी दिल्या. बांबू लागवडीसाठी जलव्यवस्थापन आराखडा, कुरण विकास तसेच ‘जलतारा’ संकल्पनेच्या अंमलबजावणीसंदर्भात  त्यांनी मार्गदर्शन केले. 

         मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  नियोजन, महसूल, वने व पर्यावरण, ग्रामीण विकास, कृषी, सार्वजनिक बांधकाम, मृद संधारण, सिंचन आदी विभागांनी उत्तम समन्वय राखून शेतकऱ्यांना शेती पूरक बांबू लागवडीच्या माध्यमातून आर्थिक् स्त्रोत उपलब्ध करुन द्यावा. तसेच, या कार्यक्रमाच्या गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीतून जनतेला गरिबीतून बाहेर काढणेही शक्य होईल. जिल्हयाच्या हवामानानुसार बांबूच्या जातिची निवड करण्याबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

        विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी नागपूर विभागात मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच, बांबू लागवडीला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. कोनबॅक बांबू संस्थेचे संजीव करपे यांनी बांबू लागवड, उत्पादन आणि विपनण आदी विषयांवर मार्गदर्शन केले. राज्यात बांबू लागवडीसाठी नेमण्यात आलेल्या टास्कफोर्स, स्टिअरिंग कमिटी आणि टेक्निकल कमिटी आदींविषयी अभिजीत घोरपडे यांनी  माहिती दिली. राजलक्ष्मी शहा यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.