राज्यातील 45 हजार गावांचा सुविधा आराखडा होणार
ग्राम सुविधा आराखडा तयार होणार- धनंजय सुटे
नागपूर, दि.14 - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संदर्भात ग्राम सुविधा आराखडा तयार करण्यासाठी बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेचे दीप प्रज्वलन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सौम्या शर्मा यांचे हस्ते झाले व कार्यशाळेचे प्रास्ताविक करतांना धनंजय सुटे, उपायुक्त (नियोजन) विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत नियोजन विभागाने महाराष्ट्र राज्यातील एकूण 45,000 गावांत उपलब्ध असलेल्या सर्व सोईसुविधांच्या अनुषंगाने अद्यावत माहिती गोळा करण्याचे ठरविलेले आहे. यापुर्वी सन 2012 मध्ये ग्राम सुविधांबाबत एकूण 8 पत्रकांमध्ये सविस्तर माहिती गोळा करण्यात आलेली होती. परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये विविध क्षेत्रांमध्ये आमुलाग्र बदल झाल्यामुळे ब-याचशा सुविधा कालबाहय झालेल्या असून नविन सुविधांची गरज निर्माण झालेली आहे ही बाब विचारात घेता नागपूर जिल्हयातील हिंगणा तालुक्यातील तीन गावांची ग्रामस्तरावर काम करीत असलेले सर्व क्षेत्राचे अधिकारी / पदाधिकारी / कर्मचारी यांना कार्यशाळेसाठी बोलाविण्यात आले होते. तसेच संबंधित सर्व विभागांचे जिल्हास्तरीय /तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. सर्व संबंधित उपस्थित कर्मचा-यांकडून नियोजन विभागाने तयार केलेल्या ग्राम स्तरावरील सुविधाबाबतच्या पत्रकाचे अनुषंगाने आढावा घेण्यात आला या नंतर सदर पत्रके अंतिम करुन त्या एकूण सर्व महाराष्ट्रातील सर्व गावांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत माहिती गोळा करुन वेळोवेळी अद्यावरत करण्यात येणार असून सर्वांसाठी डॅशबोर्डद्वारे माहिती उपलब्ध होणार आहे व सदर माहितीचा उपयोग जिल्हा विकास आराखडा, आपत्ती व्यवस्थापन, आकांक्षीत जिल्हा / तालुका इत्यादी कार्यक्रमांसाठी त्याचा उपयोग होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे अपर संचालक श्री.पुष्कर भगूरकर यांनी ग्राम सुविधा पत्रकाचे महत्व विशद करतांना सदर कार्यक्रम हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत् नियोजन विभागाच्या महत्वाचा कार्यक्रम असून सदर माहितीची उपयुक्तता सविस्तर सांगितली.
अध्यक्षीय भाषणात श्रीमती सौम्या शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर यांनी उपस्थित सर्व अधिकारी व संबंधितांना सदर माहितीचे महत्व लक्षांत घेता सविस्तर माहिती देण्याच्या सूचना दिल्यात.
सदर कार्यशाळेत सहसंचालक श्री.क्रिष्णा फिरके, जिल्हा नियोजन अधिकारी गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्रीमती भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जाधव, मिलिंद नारिंगे, उपसंचालक, संजय पाठक,उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय तसेच नियोजन व अर्थ व सांख्यिकी कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन श्री.राजेश गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी,नागपूर यांनी व आभार प्रदर्शन श्री.संजय पाठक उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय नागपूर यांनी केले.