info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  10 Aug 2021

प्रतिकारशक्ती वाढविण्यास रानभाज्या उपयुक्त


- रानभाज्या महोत्सवाला लोकांचा प्रतिसाद
नागपूर, दि 9 :  रानभाज्या महोत्सवातून निसर्गातील वैविध्यपूर्ण रानभाज्याची शहरी भागातील नागरिकांना ओळख होते. विविध औषधी गुणधर्माने युक्त या भाज्यानी. रोगाशी लढण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी रानभाज्या महोत्सव उपयुक्त असल्याचे प्रतिपादन  विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी  केले. 

रानभाज्यांना ओळख मिळवून त्यांची विक्री व्यवस्था व उत्पादन साखळी निर्माण होवून शेतकऱ्यांना फायदा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुरुवातीला स्टॉलची पाहणी करून रानभाज्यांची वैशिष्टये व माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी विमला आर यांनी देखील महिला बचतगटांनी, शेतकरी महिला बचतगटांनी रानभाज्या, रानफळांच्या चविष्ट पाककृती करुन त्यांचे प्रदर्शन आयोजित करण्याची सूचना केली. यावेळी योग्य प्रचार-प्रसिध्दीव्दारे या  महोत्सवातील सहभागी स्टॉल विक्रेत्यांच्या रानभाज्यांची विक्री झाली पाहीजे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रकल्प संचालक कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) यांच्यावतीने आज संरपच भवनाच्या प्रांगणात आयोजित करण्यात शासकीय वसाहतीतील मैदानात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी सहसंचालक कृषी रविंद्र भोसले, जिल्हा कृषी अधिक्षक मिलींद शेंडे, संचालक आत्मा नलीनी भोयर, प्रज्ञा गोडघाटे, कृषी विकास अधिकारी वंदना भेले, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पंचभाई उपस्थित होते.
यावेळी उभय अधिकाऱ्यांनी जागतिक आदिवासी दिनानिम्मित बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. चिंब पावसातही आज नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर रानभाज्या महोत्सवात  भाज्यांची खरेदी केली. त्यामध्ये श्रावणातील पालेभाज्यांची व रानफळांची विशेष रेलचेल होती. चंदनबटवा, अळु, अंबाडी, समुद्र घोष, चिवई, गावरानीकोहळे, सुरण, काटवेल, गुळवेल, शेवगा, बांबु आस्ते, खापरखुटी, चंदनबटवा,केना ,कुंजीर,यासारख्या रानभाज्यांचा समावेश होता.
रानभाज्या महोत्सवातील सर्वच भाज्यांचे औषधी गुणधर्मासह त्यांच्या पाककृतीची माहिती स्टॉल वर लावल्याने नागरीकांनी  उत्साहाने भाज्या खरेदी केल्या.एकूण 14 स्टॉल वर 250 च्या वर भाज्या व रानफळ उपलब्ध होते.
रानभाज्या महोत्सवाने  शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळेल व शहरी जनतेला देखील रानभाज्यांची ओळख होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कार्यक्रमाचे संचलन कृषी उपसंचालक अरविंद उपरीकर तर  आभारप्रदर्शन जिल्हा कृषी अधिक्षक मिलींद शेंडे यांनी मानले.