info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  10 Aug 2021

शेतकर्‍यांना बोनस,उन्हाळी पिकांची रक्कम त्वरित द्या*


*-माजी मंत्री राजकुमार बडोले यांची मागणी*
*-जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन*

गोंदिया, दि.10 -
केवळ 50 टक्के बोनस देऊन आघाडी शासनाने शेतकर्‍यांची बोळवण केली . अद्यापही शेतकर्‍यांना उन्हाळी धान विक्रीचे चुकारे देण्यात आले नाही. पीक कर्जासाठी शेतकर्‍यांना बँकाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. पीक कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदान मिळालेले नाही. महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणा करते. मात्र शब्द पाळत नाही. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या प्रलंबित सर्व मागण्या पुर्ण करून बोनस व उन्हाळी धानाची रक्कम तत्काळ द्यावी, अन्यथा भाजपातर्फे या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी  10 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी माजी आमदार हेमंत पटले, भाजपा जिल्हा महामंत्री संजय कुळकर्णी, जयंत शुक्ला, राजेश कठाणे, शिशिर येडे आदि उपस्थित होते. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना प्रती क्विंटल 700 रुपये बोनस देण्याची महाविकास आघाडी सरकारने घोषणा केली होती. मात्र धानाचे बोनस टप्प्या टप्प्याने दिले जात असून अद्याप पूर्ण रक्कम दिली गेली नाही. त्यामुळे त्वरित धानाच्या बोनसची रक्कम शेतकर्‍यांना देण्यात यावी. उन्हाळी धान विक्रीची रक्कम शेतकर्‍यांना मिळालेली नाही. जिल्ह्यातील शेतकरी धान रोवणीसाठी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. त्यामुळे धानाचे चुकारे त्वरित देण्यात यावे. कोरोनामुळे शेतकर्‍यांची परिस्थिती नाजुक असतांना पिक कर्जासाठी बँकेच्या दारात दररोज हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेषत: अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी, गोठणगाव क्षेत्रातील शेतकर्‍यांना बँका कर्ज देण्यात टाळाटाळ करीत आहेत. एकीकडे पावसाची अवकृपा तर दुसरीकडे बँकेकडून कर्ज देण्यास टाळाटाळ या प्रकारामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकर्‍यांना आर्थिक बळ देण्यासाठी त्यांना बोनस व उन्हाळी धानाची रक्कम तसेच नियमित कर्ज परत करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपयांचे अनुदान तत्काळ द्यावे, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
...