info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  27 Nov 2023

शहरांसाठी सर्कूलर इकॅानामी पार्कची गरज- फडणवीस नागपूर, दि. 27 -  प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहरांच्या निर्मितीसाठी आज कचऱ्यावर प्रक्रिया करीत मूल्य निर्मितीची गरज आहे. यासाठी सर्कुलर इकॉनॉमी हे उत्तम उदाहरण आहे. महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. राज्यात विविध ठिकाणी सर्कुलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते  आज नागपूर महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. 

कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, आ. टेकचंद सावरकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, केदार वझे, मृणाल ठाकूर आदी उपस्थित होते. 

   नागपूर शहरात घराघरातून, दुकाने, आस्थानांमधून निघणा-या कच-यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे.

अत्याधुनिक डच तंत्रज्ञान या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. घनकचरा प्रकल्पाचे अनेक प्रयोग करण्यात आले. मात्र त्यात यश आले नाही. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील अडचणी शासन स्तरावरून दूर करीत आज या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षात नागपूरचा वेगाने विकास झाला आहे. मात्र,
घनकचरा प्रकल्प नसल्यामुळे स्वच्छ भारत व अन्य स्वच्छतेशी संबंधित अभियानात नागपूरची क्रमवारी घसरायची. आता क्रमवारी सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प यशस्वीरित्या सुरू करण्यात आला आहे.देशाच्या एकूण जीडीपी मध्ये 65 टक्के वाटा हा शहरांचा आहे. शहरांचे महत्त्व लक्षात घेता ही शहरे प्रदूषणमुक्त असावी यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी विविध उपाययोजना, प्रकल्प शासनस्तरावरून राबविण्यात येत असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

नागपुरासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. 
या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँस, कम्पोस्ट, आरडीएफ यासारखे बाय-प्रोडक्ट तयार होणार असून,  मनपाला रॉयल्टी प्राप्त होणार आहेत. प्रदुषणमुक्तीकडे नागपूरचे हे पाऊल असल्याचे श्री. गडकरी म्हणाले. प्रास्ताविक मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.