info@lokhitnews24.com

+91 9834-245-768

  09 Jan 2023

दोन दिवसात नकाशे दुरूस्त करा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

*दोन दिवसात नकाशे दुरूस्त करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश*

-  डोंगरगाव- रेगेंपार रखडलेले पुल प्रकरण

गोंदिया, दि.9 - सडक/अर्जुनी तालुक्यातील  रखडलेल्या डोंगरगाव- रेगेंपार पुलाचे नकाशे दोन दिवसात दुरूस्त करा, असे निर्देश जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी भूमिअभिलेख खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले.
या रखडलेल्या पुलाचे काम तातडीने मार्गी लावण्याचे आदेश गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना हिवाळी अधिवेशनाच्या काळात दिले होते. तेव्हापासून या कामाचा आढावा पालकमंत्र्यांचे ओएसडी घेत आहेत. दरम्यान सार्वजनिक खात्याच्या अधिकाऱ्यांनी दोनदा या पुलाला भेट देवून पहाणी केली. त्यानंतर पुलाच्या कामाचा आढावा आज जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी त्यांच्या कार्यालयात घेतला. बैठकीला सार्वजनिक बांधकाम खाते व भूमि अभिलेख खात्याचे अधिकारी हजर होते.
  बैठकीत कार्यकारी अभियंता जावेद, उप अभियंता सचिन शिंदे, उपअभियंता लांजेवार यांनी आम्ही बांधकाम करण्यास तयार आहेत. 60 लाखाचा निधी सुध्दा उपलब्ध आहे. भूमिलेख खात्याच्या अधिकाऱ्यामुळे घोळ वाढला. पुलाच्या अप्रोच मार्गास लागणारी जमिन खासगी आहे की सरकारी आहे. हे एकदा स्पष्ट सांगण्यात यावे. खासगी जमिन जात असेल तर  भूसंपादनाची आमची तयारी आहे. भूमिअभिलेख खात्याने जागेचा सोक्षमोक्ष  लावला तर पुलाच्या कामातील अडथळे दूर होतील. भूमिअभिलेख खात्याच्या चुकीमुळे  या पुलाचे काम  दीर्घ कालावधीपासून रखडले असल्याचे  सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांची बाजू ऐकली. त्यानंतर जिल्हाधिकारी गोतमारे यांनी भूमिअभिलेख खात्याच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसात नकाशे दुरूस्त करा . सुधारित नकाशे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सोपवा.  रखडलेल्या पुलाचे काम तातडीने करा. लोकांची गैरसोय दूर करा असे निर्देश  दिले.

 रेगेंपार, डोंगरगाव आणि परसोडी या तीन गावांत नुकत्याच निवडणुका झाल्या. तिन्ही ठिकाणी तरूण सरपंच निवडून आलेत. त्यात
 डोंगरगावच्या सरपंच  पोर्णिमा गणवीर, रेगेंपारच्या सरपंच वनिता  कोरे, परसोडीचे सरपंच तुळशीराम शिवणकर आहेत. 
*परसोडी बॉयपास मार्ग*
परसोडीतील वाढते अपघात आणि वाहतूकीच्या धुळीचा त्रास वाढला. त्यावर तोडगा म्हणून परसोडी तलावाच्या काठाने परसोडी-डोंगरगाव बॉयपास मार्ग काढण्याच्या कामाबाबतही चर्चा झाली.